मुंबई : केवळ तांत्रिक चुकांमुळे एखाद्या उमेदवाराची राजकीय कारकिर्द धोक्यात आणू नका. निवडणूक प्रक्रिया नियमांत असलेल्या त्रुटी दूर करून निवडणूक लढवण्यासाठी जास्तीतजास्त लोक पुढे येतील यादृष्टीने पावले उचला, अशी सूचना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने उच्च न्यायालयाने घाटकोपरच्या १२६ प्रभागातील उमेदवार प्रतीक्षा घुगे यांना दिलासा देण्यास नकार दिला.एन वॉर्डच्या १२६ प्रभागातून काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रतीक्षा घुगे यांचा उमेदवारी अर्ज केवळ तांत्रिक चुकीमुळे रद्द करण्यात आला. आॅनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट-आऊट घेताना राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हँग झाले. त्यामुळे शेवटच्या दोन पानांचे प्रिंट-आऊट काढता आले नाही. घुगे यांनी फॉर्म निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांपाुढे सादर केला. मात्र अखेरच्या दोन पानांचे प्रिंट-आऊट नसल्याने त्यांनी घुगेंचा फॉर्म रद्द केला. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले.निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हँग झाल्याने फॉर्मच्या शेवटच्या दोन पानांची प्रिंट-आऊट काढू शकलो नाही. त्यात उमेदवाराची चूक नाही. ही चूक निवडणूक आयोगाची आहे. उमेदवाराने आॅनलाइन अर्ज भरला असून, ते पाहण्याची सोय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आहे. ही सुविधा उपलब्ध असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सहकार्य केले नाही. निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याची भीती आहे, असा युक्तिवाद घुगे यांचे वकील हर्षद भडभडे यांनी उच्च न्यायालयात केला. निवडणूक आयोगाने ही चूक मान्य करत यापुढे नियमांमध्ये योग्य ते बदल करण्यात येतील, अशी हमी उच्च न्यायालयाला दिली. ‘ही गंभीर केस आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीचा फटका उमेदवाराला सहन करावा लागतोय. तांत्रिक चुकांमुळे एखाद्या उमेदवाराची राजकीय कारकिर्द धोक्यात आणू नका. जास्तीतजास्त लोकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यादृष्टीने निवडणूक प्रक्रिया नियमांमध्ये योग्य सुधारणा करा,’ अशी सूचना उच्च न्यायालयाने आयोगाला केली. (प्रतिनिधी)
तांत्रिक चुकांमुळे उमेदवाराची राजकीय कारकिर्द धोक्यात आणू नका
By admin | Published: February 17, 2017 3:08 AM