ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये असं आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलं आहे. महिलांसाठी आरक्षण या निर्णयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यातील महिलांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार व प्रतिभा पवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना प्रतिभाताई पाटील यांनी हे मत व्यक्त केलं.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक तसेच पुण्यातील विविध माजी महिला महापौरांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. खासदार सुप्रिया सुळे, रजनी पाटील, माजी केंद्रीय कृषी सचिव राधा सिंग तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला प्रतिनिधी या वेळी उपस्थित होत्या.
‘शरद पवार यांचं नाव सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे आणि ते त्यासाठी नाही म्हणत आहेत. हे मला माहिती आहे. पण त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये. असं मला त्यांना सांगायचं आहे’, असं प्रतिभाताई पाटील बोलल्या आहेत.
प्रतिभाताई पाटील यांनी पवार यांचा दूरदृष्टीचा नेता अशा शब्दांत गौरव केला. महिलांची उपेक्षा कोणाच्या लक्षातही आली नव्हती ती पवार यांच्या आली व त्यांनी सन्मान देणारी कृतीही केली. ७५ वर्षे काय, त्यांनी आणखी २५ वर्षे देशासाठी काम करावे असं प्रतिभाताई पाटील बोलल्या आहेत.
संधी दिली तर महिला उत्कृष्ट काम करू शकतात. लष्करापासून सर्वत्र आज महिलांसाठी संधी निर्माण झाली असून, आपण पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अशी संधी देण्याचा पहिला निर्णय घेता आला याचा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
पवार म्हणाले, महिलांना कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेतच स्थान नव्हते तर समाजकारण, राजकारणात कुठून असणार? ते देता आले याचे समाधान आहे. कर्तृत्व फक्त पुरुषांतच नसते हे महिलांनी सिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे या कर्तृत्ववान महिलांनी त्याचा पाया घातला होता. सरकारी धोरणात ते बसवता आले तर त्याचा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग होईल असा विचार होता. तो बरोबर होता ते सिद्ध झाले आहे. आता सैन्यातही आरक्षण आहे. तिथेही त्यांनी कर्तृत्व दाखवले आहे.