औरंगाबाद, दि. ५ : शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. सरकार जरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले.
श्रीहरी पॅव्हेलियन येथे शिवाई एमबीएन विकास मंडळातर्फे भरविण्यात आलेल्या एबीएन एक्सपो या उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, आ. सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, माजी आ. कल्याण काळे, प्रदीप सोळूंके, रंगनाथ काळे, जि.प.अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, गीता देशमुख, अनुश्री मुळे, वृषाली देशमुख यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतीलच असे नाही. शिष्यवृत्ती मिळाली तरी आजच्या शिक्षणाचा खर्च कमी नाही. त्यामुळे तरुण-तरुणींनी उद्योग, व्यापाराकडे वळाले पाहिजे. खा.दानवे यांना उद्देश्यून ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पुर्ण ताकद लावा. मतभेद असतील तर ते दूर करून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती समोर आणा. कायदेशीर अडचणी आहेत. नवीन आलेले सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु समाजात खदखद वाढलेली आहे. सहनशीलता संपत आली आहे. खा.दानवे यांनी सरकार उद्योगवृध्दीसाठी करीत असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
कृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा द्याकृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा दिला जावा. शेतमालाचे भाव कोसळले तरी शेतक-यांना कायद्याने भाव मिळेल. गेल्यावर्षी तुर खरेदीत सरकारचे अंदाज चुकले आहेत. कृषि अर्थव्यवस्था मजूबत झाली पाहिजे. शेतीवर सगळ्या समाजाचे पोट भरते. परंतु शेतीवर अवलंबून राहणे जमणार नाही. नोक-यांचे काही खरे नाही. माहिती-तंत्रज्ञानामुळे अनेक नोक-यांवर गदा येत आहे. नोक-यांना गृहित धरु नका. अन्नप्रक्रिया, उत्पादन क्षेत्राकडे समाजाने वळावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.