पुणे : काेराेनाचे रुग्ण भारतात आढळल्याने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात काेराेनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वचस्तरातून काेराेनाला राेखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या राेगाच्या पार्श्वभूमिवर गर्दी हाेणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मास्कची हाेणारी साठेबाजी राेखण्यासाठी देखील आता उपाययाेजना करण्यात येत आहेत.
देशात काेराेना बाधित रुग्णांची संख्या तीसवर जाऊन पाेहचल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. नागरिकांकडून काेराेनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या मास्कचा तुटवडा असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात काेराेेनाचा एकही रुग्ण अद्याप तपासणीतून समाेर आला नसल्याने सध्यातरी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक दुकानदारांकडून या मास्कची साठेबाजी करण्यात येत असल्याने या मास्कची किंमत दाेनशे ते तीनशे रुपयांपर्यंत जाऊन पाेहचली आहे. त्यामुळे मास्कची साठेबाजी राेखण्यासाठी औषध दुकानदारांनी डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नये असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान ६ मार्चपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६८४ विमानांमधील ८३,५१६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे.