ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - न्यायालय हिंदूंच्या सणांसंबंधी निकाल देताना भेदभाव करतेय. दहीहंडीतलं ध्वनिप्रदूषण दिसतं पण मशिदींवरचे लाऊड स्पीकर चालू असतात ते कसे चालतं?. हिंदूंच्या सणांवर बंधन का ? मोहरमच्या मिरवणूकांमध्ये पाठिवर मारुन घेतात तिथे जीवाला धोका नसतो का ? असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारले आहेत.
दहीहंडी संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली. दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा जास्त असू नये मग आता, स्टुलावर उभ राहून हंडी फोडायची का ? असा सवाल राज यांनी विचारला.
प्रत्येक गोष्टीत कोर्टाला नाक खुपसायची सवय लागली आहे. दहीहंडीवर निर्णय घेण्याचा कोर्टाला कोणी अधिकार दिला. प्रत्येक निर्णय कोर्ट देणार असेल तर, सरकारची गरजच काय ?, देश सुद्धा कोर्टानेच चालवावा अशा शब्दात न्यायालयाच्या वाढत्या हस्तक्षेपावर राज यांनी टीका केली.
क्रिकेट खेळताना चेंडू लागतो. ऑलिम्पिकमध्ये पण खेळाडूंना दुखापत होते मग ऑलिम्पिक बंद करायची का ? असे प्रश्न त्यांनी विचारले. दहीहंडी उत्सवातील ध्वनिप्रदूषण तसेच तीन-चार वर्षांच्या मुलांना हंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थरावर चढवण्याचे आपण अजिबात समर्थन करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याबद्दल त्यांनी फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. न्यायालय एका याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून कसे काय निर्णय देते. त्यांनी या उत्सवात सहभागी होणा-या मंडळांना बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असे राज यांनी सांगितले.
दहीहंडीवरुन न्यायालयावर टीकेचे आसूड ओढताना राज यांनी मुस्लिमांच्या प्रथांना लक्ष्य केले. प्रथमच राज यांनी इतकी स्पष्ट भूमिका घेऊन भविष्यात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरपणे मांडण्याचे संकेत दिले.