प्रफुल्ल बानगावकर
कारंजा ( वाशिम ), दि. 22 - मृत्यूनंतर पार पाडल्या जाणाऱ्या परंपरागत विधींमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमावर कुठलाही खर्च न करता तो पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करा, असा सल्ला जानोरी येथील अन्नपूर्णा स्वयंसहायता बचतगटातील जिगरबाज महिला सदस्यांनी दिला आहे.
चित्रपट अभिनेता अमिर खान याने सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभागी होउन अनेकांना पाण्याचे महत्व कळायला लागले आहे. फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ ही महाराष्टातील ३० तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात वाशिम जिल्हयातील कारंजा तालुक्याची या स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेत १०० टक्के गावचा सहभाग आहे. त्यात ३ पुरूष व २ महीलांची ग्रामसभेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या गावातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेउन आल्यानंतर ग्राम वाठोडा येथे केलेल्या मार्गदर्शनाने प्रेरीत होउन अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या मुलांना आवाहन केले की, मरणानंतर आमची तेरवी करण्यापेक्षा गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तेरवीत होणाऱ्या पैश्याच्या खर्चातून गावात जलसंधारणाची कामे करा, जणेकरून तुमच्या मुलाबाळांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही. दुष्काळाची झळ सोसताना आम्हाला झालेले दु:ख शब्दात मांडण्यासारखे नसून आज सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे कळले आहे.
जीवनात कशाची गरज आहे, याची जाणीव ठेवत मुलांनो समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणीच महत्वाचे आहे. पाणी हेच जीवन आहे, तेव्हा पाणी अडवा-पाणी जिरवा हे आम्हास कळले आहे. येणाऱ्या पिढीला पण दुष्काळाचे चटके सहन करण्याची वेळ येउ नये, याकरीता पाण्याला जपा. कारण पाणी राहील तरच हरीतक्रांती राहील. पाण्यामुळै समृध्द जीवन जगण्यासाठी मदत होईल. वेळप्रसंगी आमची तेरवी करू नका, तेरवीकरीता येणारा खर्च आमच्या जीवंतपणीच जलसंधारणाच्या कामांवर खर्च करा, असे भावनिक आवाहन अन्नपूर्णा बचतगटाच्या अध्यक्ष नंदा पुरूषोत्तम भिंगारे, सचिव अन्नपूर्णा रमेश भिंगारे, संगिता संतोष भिंगारे, रेखा प्रल्हाद भिंगारे, संगिता साहेबराव भिंगारे, इंदुताई गणेश भिंगारे, गंगाबाई तुळशिराम भिंगारे या महिलांनी केले आहे. असा संकल्प करणाऱ्या महिलांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे गावात वॉटर कपसाठी महीलांचे मतपरीवर्तन होत असून महीलांनी केलेल्या या निर्धारामुळे पाणी फाउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला मुर्तस्वरूप येउन भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई दुर झाल्याशिवाय राहणार नसल्याचे दिसून येत आहे.