मुंबई - राज्यातील शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करण्याच्या निर्णयावरून हायकोर्टाने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्य सरकारला दणका दिला आहे. शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा सरकारचा निर्णय रद्द करताना हायकोर्टाने यापुढे शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगारही मुंबै बँकेत जमा करू नका, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारने शिक्षकांना पगार जमा करण्यासाठी मुंबै बँकेत खाते उघडण्याची सूचना केली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई हायकोर्टात खटला सुरू होता. अखेर शुक्रवारी या प्रकरणी निकाल देताना हायकोर्टाने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खरडपट्टी काढली. विरोधी पक्षनेते असताना मुंबै जिल्हा सहकारी बँकेवर अनियमिततेचा आरोप करणारे आणि राज्यपालांपर्यंत तक्रार करणाऱ्या विनोद तावडेंनी शिक्षण मंत्री झाल्यावर याच बँकेकडे शिक्षकांना खाती कशी उघडायला लावली? हे न समजण्यासारखे आहे, असे खरमरीत ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत.
शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, हायकोर्टाचा शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 5:06 PM