मुंबई : आपले सरकार आले तेव्हा हे सरकार १५ दिवसात पडेल, एका महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल, अशी टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून नाही तर ठासून आपण दोन वर्ष पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला.
आझाद मैदानावर शिंदेसेनेचा तिसरा दसरा मेळावा शनिवारी पार पडला. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. काही लोकांना हल्ली हिंदू शब्दाची ॲलर्जी झाली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही लोकांची जीभ कचरू लागली आहे, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपण शिकलो; पण नर्मदेतील गोटे कोरडेच राहिले, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आपण सरकार बनवले नसते तर, सकाळ झाली मोरू उठला, मोरूने आंघोळ केली, मोरू परत झोपला हेच पहायला मिळाले असते, आज मोरू मला मुख्यमंत्री करा म्हणत गल्लोगल्ली फिरत आहे. लोकसभेत विरोधकांना चुकून एवढ्या जागा मिळाल्या. पण येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.
आणखी महामंडळे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्याला होलार समाजासाठी महामंडळ नसल्याचे सांगितले. होलार समाजासाठीही हे सरकार महामंडळ स्थापन करेल. गर्दीतून ‘वंजारींसाठी’ अशी घोषणा एकाने केल्यानंतर वंजारी समाजासाठीही महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
‘त्यांनी लावलेले स्पीड ब्रेकर उखडून टाकले’पहिले अडीच वर्ष महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी या राज्यात सत्तेवर होती. सर्व प्रकल्पांना त्यांनी स्पीड ब्रेकर लावला. आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि ज्या सरकारने ते टाकले होते त्या सरकारलाही उखडून टाकले.
‘माझी दाढी खुपते’माझी दाढी त्यांना खुपते आहे. पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.