ऑनलाइन लोकमत -
क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची क्रीडा क्षेत्रत शान उंचावली
पुणे, दि. 07 - एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शान उंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडक विजेते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केली.
पुणे आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् एक्स्पोतर्फे (पीआयएसई) ऑलिंपियन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख संयोजक डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची आई वर्षा, क्रिकेटपटू झहीरचे आई-वडील झाकिया-बख्तियार, फुटबॉलपटू सुनील छेत्रीचे वडील केबी छेत्री, हॉकीपटू धनराज पिल्लेची आई अंदालम्मा, स्पेशल ऑलिंपिकचा खेळाडू भरत चव्हाणचे वडील जय यांना कपिलदेव यांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कपिलदेव म्हणाले, ‘‘आपला मुलगा इंजिनिअर, डॉक्टर झाला नाही तरी खेळाडू बनूनही मोठा होऊ शकतो, हे आता पालकांना कळले आहे. त्यामुळेच आपल्या मुलाने सचिन, विराट बनावे, असे स्वप्न पाहणारे पालक आज दिसत आहेत. मुलांच्या हातातून पेन-पेन्सिल काढून घेऊ नका, पण तसेच त्यांच्या हातातून बॅट-बॉलसुद्धा काढून घेऊ नका. आपल्या देशात क्रीडा संस्कृती वाढत आहे, ही चांगली बाब आहे. आपल्याकडे आता खेळाडूंना प्रोत्साहनसुद्धा दिले जात आहे. आजचा दिवस अशा पालकांचा आहे. खेळाडूच्या वाटय़ाला अनेक सत्कार येतात, पण पालकांच्या वाटय़ाला असा गौरवाचा क्षण दुर्मिळ असतो. हा योग जुळवून आणल्याबद्दल मी पुणो स्पोर्टस् एक्स्पोचे अभिनंदन करतो. वास्तविक एखादी मोठी व्यक्ती काही कारणामुळे उपस्थित राहू शकत नसेल तर आमंत्रण येते. माङयाबाबतीत हेच घडले, पण येथे आल्यामुळे मला खरोखरच आनंद झाला आहे. पुणे स्पोर्टस् एक्स्पोने क्रीडा क्षेत्रात एक नवा पायंडा पडला आणि त्याचा साक्षीदार मी होऊ शकलो, याचा मला आनंद होत आहे.
डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यांनी पालकांचा सन्मान करणे हा पीआयएसईचा बहुमान असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की बार्शीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून प्रार्थना ठोंबरेचा तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे उदय झाला. आता हीच प्रार्थना ऑलिंपिकमध्ये सानियासह भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची अपेक्षा आहे. तिने महाराष्ट्राची आणि देशाची शान उंचावली आहे. बहुसंख्य पालक मुलांना खेळू नको, अभ्यास कर म्हणतात. बख्तियार खान यांनी झहीर इंजिनिअर असूनही त्याच्या क्रिकेटला प्रोत्साहन दिले. ते पालकांसाठी आदर्श आहेत. केबी छेत्री यांच्या पाठिंब्यामुळेच सुनील तरुण वयात देशाचे नेतृत्व करू शकला. धनराजला घरात अनेक हॉकीपटू असण्याचा फायदा झाला आणि अंदालम्मा यांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पेशल ऑलिंपियन घडविलेल्या जय चव्हाण यांना तर सलाम करावा लागेल.