‘सहारा’ सारखी अवस्था करून घेऊ नका , डीएसकेंना १ फेब्रुवारीपर्यंत मुदत : हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:55 AM2018-01-26T03:55:48+5:302018-01-26T03:56:08+5:30
डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले.
मुंबई : डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले. ‘सहारा’सारखी अवस्था करून घेऊ नका. तुम्हाला (डीएसके) कारागृहात टाकण्यासाठी एक क्षणही लागणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने त्यांना तंबी दिली. गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, म्हणून न्यायालयाने पुन्हा डीएसकेंना पैसे भरण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली.
२२ डिसेंबरच्या सुनावणीत डीएसकेंच्या वकिलांनी ५० कोटी रुपये भरण्यासाठी ७२ तासांची मुदत मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पैसे भरण्याचा आदेश दिला होता. मात्र, बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे डीएसकेंच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे डीएसके न्यायालयात पैसे जमा करण्यास अपयशी ठरले.
डीएसके मुदतीत पैसे जमा करू न शकल्याने न्यायालयाचा संताप व्यक्त केला. डीएसकेंना कोठडीत पाठवून गुंतवणुकदारांना पैसे मिळणार नाहीत, अशी खंतही बोलून दाखवली. त्यांच्या लिलाव करण्यायोग्य मालमत्तांची यादी २ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे पोलिसांना सांगितले. डीएसकेंना ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला आहे. गुंतणूकदारांचे पैसे थकविल्याने पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण त्यांच्यावर विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली, तर बँकांनाही त्यांची खाती गोठविण्याचा आदेश दिला आहे.