ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 25 - राम गणेश गडकरी पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहणारी दडपशाही कलाकार व प्रेक्षक सहन करणार नाहीत असा रोखठोक जबाब उस्मानाबाद येथील नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी कल्याणमध्ये दिला.
सीकेपी संस्था कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातर्फे भाषाप्रभु राम गणेश गडकरी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीसोहळा कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयंत सावरकर यांनी सांस्कृतिक चळवळीत येऊ पाहणाऱ्या दहशतवादा बद्दल आपले मन मोकळे केले. समारोहास कायस्थ प्रबोधनच्या संपादिका नीता प्रधान, उद्योजक समीर गुप्ते, संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रसंघटक दिपक सोनाळकर, परिवहन सदस्य राजू दिक्षीत तसेच सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाल दुर्वे, शास्त्रज्ञ अजित महाडकर, प्रशांत मुल्हेरकर, अशोक कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर आदी उपस्थित होते.
आज गडकऱ्यांचा पुतळा फोडला उद्या ही मंडळी कोणती नाटके बघा आणि बघू नका हे सुध्दा सांगतील. त्यांना वेळीच प्रतिबंध केला पाहिजे. राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावर अनेक कलाकारांचे संसार उभे राहिले. आपले आजचे वय 82 वर्षे आहे. आपण अनेक नाटकांमध्ये कामे केली. परंतु सर्वात जास्त कामे राम गणेश गडकरी यांच्या नाटकांमध्ये केली व त्या नाटकांमुळेच आपल्यासारख्यांचा संसार उभे राहिल्याचे जयंत सावरकर यांनी सांगितले.
राम गणेश गडकरी यांची भाषाशैली अमोघ होती. ज्याला `श' आणि `ष' याच्यातील शब्दोच्चार उच्चारता येत नाहीत ती व्यक्ती गडकऱ्यांच्या नाटकात काम करुच शकत नाहीत. स्पष्ट उच्चार आणि समाजाला काहीतरी नवे देणे, समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे गडकऱ्यांच्या लेखनाचे वैशिष्ट होते. ज्या राजसंन्यास नाटकावरुन एवढा गहजब केला जातो. त्या राजसंन्यासचे आतापर्यंत फक्त तीन प्रयोग झाले त्यातील दोन प्रयोगात आपण काम केले आहे. राजसंन्यास नाटक खरोखरंच गडकऱ्यांनी लिहिले आहे का, याची तरी खातरजमा करायला हवी होती. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात राजसंन्यासचा काही भाग गडकऱ्यांनी आपल्या लेखनिकाकरवी लिहून घेतला व उर्वरित नाटक गडकऱ्यांच्या पश्चात पूर्ण झाले, ही वस्तुस्थिती असल्याचेही जयंत सावरकर यांनी सांगितले.
जयंत सावरकरांचा गौरव...
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातर्फे संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जयंत सावरकर यांचा शानदार सत्कार करुन गौरव केला. तसेच कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जयंत सावरकर यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.