पुणे : पुणेकरांनी एक दिवसाआड पाणीकपात करून वाचविलेले पाणी इतरांना देता येणार नाही. शहराला ३१ जुलैपर्यंत इतका पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिलाच पाहिजे, असा निर्णय महापालिकेमध्ये गुरुवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची लेखी माहिती पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांना कळविण्यात आली आहे.शहराच्या पाण्यातून दौंडला पाणी देण्याबाबत महापालिकेने विचार करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी करण्यात आली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी तातडीने पक्षनेत्यांची बैठक बोलावली. दौंडला जादाचे पाणी सोडण्यास पक्षनेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यानुसार पुण्याला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा धरणामध्ये ठेवलाच पाहिजे, त्यातून कोणालाही पाणी देण्यात येऊ नये, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.मागील वेळेस जुलैनंतर पाऊस झाला होता. या वेळेसही जर पावसाला उशीर झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ३ लाख लोकसंख्येच्या लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करता येऊ शकला; मात्र जर ३५ लाख लोकसंख्येच्या पुण्याच्या प्रश्न निर्माण झाला तर काय व्यवस्था करणार, असा प्रश्न जगताप यांनी या वेळी उपस्थित केला.>कालवा दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये देणार नाहीखडकवासला धरणापासून पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा करणारा कॅनॉल अनेक दिवसांपासून गळत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याचा २ कोटी रुपयांचा खर्च पुणे महापालिकेने उचलावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यावर गुरुवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. महापालिकेने पाटबंधारे विभागाकडून घेतलेल्या पाण्याची पाणीपट्टी नियमित भरली आहे. तसेच यापुढील काळात या कालव्याचा वापर शहराच्या पाण्यासाठी होणार नाही. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कोणतेही पैसे द्यायचे नाहीत, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
आमच्या पाण्याला हात लावू नका
By admin | Published: April 29, 2016 12:40 AM