मुंबई : सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने घेतला आहे. या आधी शनिवार, ९ सप्टेंबर व रविवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने घेतलेल्या निर्णयानंतर, संबंधित शिक्षकांचे प्रशिक्षण शनिवारी आणि सोमवारी होणार आहे. शिक्षक परिषदेने रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी होणाºया प्रशिक्षणाला आक्षेप घेतला होता. तसे निवेदनही ३ जुलै रोजी शिक्षण विभागाचे अवर सचिवांना, १३ जुलै रोजी विद्या प्राधिकरणचे संचालक आणि ७ सप्टेंबर रोजी मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना दिले होते. त्याची दखल घेत, शासनाने रविवारचे प्रशिक्षण रद्द केल्याचा दावा बोरनारे यांनी केला़शिक्षकांना दिलासा-बोरनारे म्हणाले की, मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने, शिक्षकांना प्रशिक्षणस्थळी पोहोचण्याला अडचणी येतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण आयोजित केल्यास, माध्यमिक शाळा संहिता व खासगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम १९८१ नुसार बदली रजा देण्यात येते. मात्र, अनेक शाळा शिक्षकांना बदली रजा देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही अवर सचिवांच्या लक्षात आणून दिले होते. त्यावर अवर सचिवांनी तातडीने कार्यवाही करून तत्काळ शासनास अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले होते.
सुट्टीदिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही! राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:04 AM