ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ६ - गेल्या वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे शेतक-यांमध्ये नैराश्य आहे. दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना करत आहोत, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही, दुष्काळी परिस्थिती ओळखून आधीच उपाययोजना सुरु केल्या होत्या, शिवाय, केंद्राला आपला प्रस्ताव वेळेत गेला आहे असे मत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत मांडले. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर लांबणीवर पडला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार राज्यातील हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात होत आहे. ठाणेतील प्रसिद्ध बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी पुरावे द्यावेत, दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असा टोला त्यांनी विरोधकाला लगावला. तर राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण घटल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला.
राज्यातील एकाही घटकाचे समाधान न करू शकणा-या अपयशी सरकार सोबत चहापान कशाला घ्यायचे असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महागाई, विदर्भ विकास, डाळ घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगीतले.
>मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
> यंदा राज्यात डाळींच्या उत्पन्नात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे
> दुष्काळी स्थितीवर भरीव उपाययोजना, मदतीसाठी केंद्राची वाट पाहणार नाही
> महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात व्यक्त केलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे
> विरोधकांना चर्चा नव्हे तर राजकारण करावे
> दुष्काळाचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे