मुंबई - जातीवाद रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अनोखी युक्ती काढली आहे. पवार यांनी राज्यात जातीच्या नावाने असलेल्या वस्त्यांची नावे बदलण्याच्या सूचना समाजिक न्याय विभागाच्या बैठकीत दिल्या. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थित होती.
राज्यात कुठेही जातीच्या नावाने वस्ती नको. त्यांची नावे बदलावीत. अशा सूचना देताना एक संघटन उभं करून अन्याय होणाऱ्या घटकांच्या पाठिशी उभं राहावे. त्यांना न्याय मिळवून द्यायची व्यवस्था करावी, असंही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, न्याय विभागाचे प्रमुख जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. धनंजय मुंडे चांगले संघटक आहे. त्यामुळे ते समाजातील सर्वच घटनकांना न्याय देतील, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तर धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे काम आव्हानात्मक असल्याचे सांगत न्याय विभागाचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे म्हटले.