नीलेश जंगम,ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)‘शीक बाबा शीक, लढायला शीककुणब्याच्या पोरा, आता लढायला शीकलाजरेपणा, बुजरेपणा बाजारात इकघेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इषमागं-मागं नको, पुढं सरायला शीकआत्महत्या नको, हत्या करायला शीक,’शेतकऱ्यांची एक पिढी आत्महत्या करून मेली. आताच्या शेतकऱ्यांना आत्महत्या न करता लढायला शिका, असे सांगणाऱ्या इंद्रजित भालेराव यांच्या या कवितेला श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. ‘ज्ञानोबा-तुकारामनगरी’तील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चौथ्या दिवशी मंगेश पाडगावकर सभागृहात (मुख्य मंडपात) सोमवारी सकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विपरीत अवस्थेबद्दल कविता सादर करताना भालेराव यांना रसिकांनी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली. या संमेलनात ३५ कवींनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी संस्कार कुडाळकर या लहान मुलाने ‘आठवण येता तुझी आई, कोणास सांगू व्यथा? मातृछत्रपण हरवून गेले, उजाड माझा माथा’ ही कविता सादर केली व अनेकांचे डोळे पाणावले. १२वीला शिकणारी प्रतीक्षा इंगळे हिने स्त्रीभ्रूणहत्येवर आधारित कविता सादर केली. दासू वैद्य अध्यक्षस्थानी होते.‘माझ्या गळ्याभोवती नातवाचे हात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवातघरभर सांडलेले बोबडे बोलनातवाच्या शब्दाला करोडोचे मोलनातू जिवलग मित्र, नात माझी काठीवाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटीहीच एक इच्छा राहिली मनात,आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात’ ही कविता लातूरचे योगिराज माने यांनी सादर करून अनेक ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. वसईच्या संगीता अरबुणे यांनी ‘मुली बदलल्या आहेत खूपशा’, गुहागर येथून आलेले ईश्वर हलगरे यांनी ‘ खांदा आणि झूल’, हेमलता पाटील यांनी ‘पाहतच नसतो आपण वाट’ या कवितेच्या माध्यमातून विधवा स्त्रीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. अशोक कुभांर यांनी ‘शहानपण’, गिरीश सपाटे यांनी ‘घर’, विष्णू सोळुंखे यांनी ‘पावसाने असे रोज येऊ नये’ अशा कविता सादर करून मने जिंकली. महेश मोरे यांनी ‘तुझ्या हंगामाला आभाळभर शुभेच्छा’ ही हृदयाला स्पर्श करणारी कविता सादर केली. ‘यशाचा सुगंध’ ही स्त्रीसंदर्भातील आशादायी कविता डॉ. सुमन नवलकर यांनी म्हटली. ठाण्याचे किरण येले यांनी ‘माझ्या लक्षात आलंय’ ही कविता सादर केली. रमण रणदिवे यांनी ‘प्रसंग एखादा’ ही गझल सादर केली. त्याला काव्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. कल्पना दुधाळ यांनी सादर केलेल्या ‘गाभाच पोखरलाय फक्त’ या कवितेतून स्त्रीजीवनावर कठोर भाष्य केले. सतीश सोळांकुरकर यांनी ‘मुंग्यांची रांग सरकत’ या कवितेतून हसविले. कविता बोरवणकर यांनी ‘लिबलिबित घराच्या बाहेरील जग’ या कवितेतून स्त्रीजाणिवा मांडल्या.अष्टीचे सय्यद अल्लाउद्दीन यांनी ‘असे आम्ही कवी सत्याग्रही’ ही दमदार कविता खड्या आवाजात सादर केली. विष्णू सोळुंखे यांच्या गझलेला दाद मिळाली. सत्यपालसिंग राजपूत यांंनी ‘सुखाची गोष्ट’तून मृत्यूविषयक चिंतन मांडले. प्रवीण दवणे, इंदूरच्या मीनाक्षी पाटील, सुहास येवलेकर, प्रशांत असनारे, संघमित्रा खंडारे, शिवाजी चाळक, संदीपान पवार, अनिल लक्ष्मण राव, अशोक कुंभार, अलकनंदा साने यांच्या कवितांना दादा मिळाली़ दीपेश सुराणा, भूषण नांदरवार, दुर्गेश सोनार, संजय ऐलवाड या पत्रकारांनीही कविसंमेलनात सहभाग घेऊन उत्कृष्ट कविता सादर केल्या. अंजली कुलकर्णी यांनी निवेदन केले.
घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इष़़ !
By admin | Published: January 19, 2016 3:17 AM