मुंबई : या वेळी स्वबळावर सत्ता आणली असती तर कुबड्यांची गरज भासली नसती. आता आपण सत्तापक्षात असल्याचे भान ठेवा, विरोधी पक्षात असल्यासारखे वागू नका, असे खडे बोल सुनावत ११ कोटी सदस्य असलेला भाजपा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. पुढील २५ वर्षे केंद्रात भाजपाचीच सत्ता राहील हा विश्वास ठेवा, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. धनपती आणि धनपशूंच्या आधारे आपल्याला सत्ता चालवायची नाही, पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याची मेहनत हेच आमचे भांडवल असले पाहिजे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दिव-दमण आणि दादर नगरहवेली येथील भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या महासंपर्क अभियानाच्या आढाव्यासाठी ही बैठक रंगशारदा येथे झाली. भ्रष्टाचार आणि नीतिमत्तेवरून शहा हे आपले मंत्री, लोकप्रतिनिधी यांना जाहीरपणे खडे बोल सुनावतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी बचावाची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपाच्या सरकारची बदनामी करणे हा काहींचा अजेंडा असून, विरोधकांकडून राईचा पर्वत केला जात आहे. एक छोटीशी गोष्ट वारंवार दाखवून सरकार भ्रष्ट असल्याचे दाखविले जात आहे, असा आरोपही शहा यांनी केला. भाजपाच्या बदनामीचे खापर त्यांनी चॅनेल्सवर फोडले. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या कार्यक्रमात भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पांघरूण घालणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत खासगीमध्ये मंत्र्यांची कानउघाडणी केली. काही मंत्र्यांना त्यांनी बोलावून समज दिली. तुमच्याबद्दल पुन्हा तक्रारी येता कामा नयेत, असे त्यांनी बजावले. (विशेष प्रतिनिधी)
सत्तेसाठी इतरांच्या कुबड्या नकोत - अमित शहा
By admin | Published: July 10, 2015 3:45 AM