जमीर काझी,
मुंबई- व्हीव्हीआयपी व्यक्तीचा दौरा, महत्त्वाची राजकीय सभा, मिरवणुकीच्या ठिकाणी कार्यक्रमापूर्वी दोन तास आणि संपल्यानंतर तेथे तासन्तास तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा आता काही प्रमाणात कमी होणार आहे. पोलीस आयुक्त/ अधीक्षकांना आवश्यकतेनुसार आणि तितक्यात मर्यादित कालावधीपुरते आता पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी जुंपावे लागणार आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबतचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुण्यातील एका कॉन्स्टेबलने सलग २१ तास बंदोबस्तासाठी जुंपल्याचे गाऱ्हाणे पत्राद्वारे मांडले होते. त्यानंतर महासंचालकांनी याबाबत योग्य खबरदारी घेत मार्गदर्शक सूचना तातडीने केली आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत आणि त्यासंबंधी अनुपालन व अनुभवाबाबतचा अहवाल मुख्यालयाला पाठवावा लागणार आहे.राज्य पोलीस दलात दोन लाखांवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत असलेल्या वर्दीवाल्यांना वर्षातील १२ महिने विविध बंदोबस्ताला सामोरे जावे लागते. महत्त्वाच्या व्यक्तीचे दौरे, राजकीय सभा, मिरवणुका, विविध धार्मिक सण, उत्सव आदी प्रसंगी महत्त्वाच्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किमान दोन तास त्यांना आधी तैनात केले जाते. बहुतांश वेळा महत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेत्यांचे कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा दोन-दोन, तीन-तीन तास उशिरा सुरू होतात आणि विलंबाने संपतात. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव तैनात असलेल्या पोलिसांना सलग ८, ९ तास किंवा त्याहूनही अधिक काळ एकाच ठिकाणी उन्हात थांबून राहावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक क्षमतेवर होतो. त्यामुळे महासंचालकांनी असे बंदोबस्त नेमताना घटकप्रमुखांना काही मार्गदर्शक सूचना घालून देण्यात आल्या आहेत. त्यांची काटकोर अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, कार्यक्रम/समारंभाच्या आयोजकांनाही अशा वेळी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण द्यावे, त्यामुळे त्यांचाही बंदोबस्ताला फायदा होईल, असे स्पष्ट केले आहे.