नाशिक : भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असून, निवडणुकीत ते पैसे वाटायला आले तर खुशाल लुटा, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अशाच प्रकारचे विधान केल्यानंतर त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सायंकाळी आंबेडकर यांनी उपरोक्त विधान केल्याने ते सुद्धा अडचणीत येऊ शकतात.नाशिकमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात कुणी पैसे वाटायला आले तर लक्ष्मीचे स्वागत करा असे मी म्हणणार नाही, तर लूट करा असेच म्हणेन. जोपर्यंत लुटणार नाही तोपर्यंत वाटप थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे वाटप रोखण्यासाठीची यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नाही तसेच पोलीस यंत्रणाही पैशांचे वाटप रोखू शकत नाही. याउलट पोलीस हे पैसे वाटप कुठे होते, याची वाटच पाहत असतात. त्यामुळे पोलिसांनीही लुटावे असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला. नेहमीच संयमी आणि अभ्यासू भूमिका मांडणारे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांची ख्याती असताना त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत पैसे लुटण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)
निवडणुकीत पैशांचे स्वागत नव्हे लूट करा!
By admin | Published: January 12, 2017 3:51 AM