मुंबई : मराठी भाषेपुढे आव्हाने नक्कीच आहेत; परंतु ही आव्हाने सोडविता येणार नाहीत असे नाही, असा सूर ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी ‘लोकमत’शी बोलताना आळवला. तसेच मराठीच्या प्रसारासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता, स्थानिक आणि वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही मत या साहित्यिकांनी व्यक्त केले. मात्र राज्यातील ११ कोटी जनता मराठी बोलत असल्यामुळे मराठीच्या भवितव्याबाबत विशेष चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.मराठीचे प्रश्न आता सर्वांना माहीत आहेत. सध्याचे शिवसेना-भाजपाचे सरकार मराठीच्या प्रश्नाची जाण असलेले आहे. त्यामुळे मराठीसाठी सध्याचे वातावरण आशादायी आहे. पाडगावकर, कुसुमाग्रज यांच्यासारख्या कवींनी आणि विचारवंतांनी मराठीसाठी अखंड झुंज दिली आहे. त्यांची तपश्चर्या निश्चितच फळाला येईल, असे मत कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले. मराठीच्या विकासासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता, विद्यापीठांनी, साहित्य परिषदांनी आणि अन्य संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) माध्यमातून आम्ही असे प्रयत्न करीतच आहोत. मराठी शाळा बंद पडत आहेत, हे काही अंशी खरे आहे. मात्र त्याचे प्रमाण फार मोठे नाही आणि मराठी शाळांची संख्या कमी झाली म्हणून मराठी संपेल असेही नाही. कारण महाराष्ट्रात मराठीला पर्याय नाही, असे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘कोमसाप’चे मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेपुढील समस्या मांडताना त्यांनी मराठी भाषेपुढील आव्हाने संस्कृतीच्या गाभाऱ्याला भिडणारी असल्याचे सांगितले. मराठीसंबंधीचे शासन आदेश फायलींमध्ये दडून आहेत आणि प्रत्यक्ष प्रशासकीय कारभार फारसा मराठीतून चालत नसल्याचेही सबनीस यांनी सांगितले.
मराठीच्या भवितव्याबाबत चिंता नको!
By admin | Published: February 27, 2016 4:47 AM