गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्क‘तुझीया बळ पंढरी नाथा,झालो निर्भर तुटली व्यथा ।घातला भार तुझीया माथा, भिये सर्वथा तुका म्हणे ।।’वय वाढले की चिंता वाढतात, काहींच्या मिटतात. वाढते वय म्हणजे निवृत्तीचे वय. या आयुष्यात आसक्ती तरी कशाची राहणार? सुख-दु:खाच्या धाग्याने विणलेल्या या आयुष्यात जे मिळाले त्यातही विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून समाधानाने डोळे मिटण्याची आंतरिक लालसा नसेल तो सच्चा वारकरी कसा?असेच एक आजोबा ज्ञानोबारायांच्या दिंडीत भेटले. वय वर्षे ८०. डोक्याला पागोटे बांधून काठी टेकवत पुढे निघालेल्या या वारकऱ्याचे नाव रंभाजी खेडे. परभणी जिल्ह्यातील सावरखेडा येथून पायी निघालेल्या या वारकऱ्याची ही ४० वी वारी आहे. वारीची कॅलेंडरवरील तारीख बघून ही माऊली एकटीच निघाली प्रवासाला!या वयातही कशाला वारी करता, या प्रश्नावर ते म्हणाले - ‘दिंडी जाताना पाहून मनाला बरे वाटत नाही. सतत विठ्ठलाचा ध्यास लागतो.’ विठ्ठलाकडे काय मागणार, या प्रश्नाच्या उत्तरात या वारकऱ्याची निष्काम भक्ती दिसली. ते म्हणाले, ‘त्याला काहीच मागणार नाही, चंद्रभागेवर जाणार, दर्शन करणार आणि परत येणार.’ ते तीन आठवड्यापासून ज्ञानोबा माऊलींच्या दिंडीत पायी वारी करीत आहेत. गावाहून निघाले तेव्हा पाऊस पडून गेला होता. गावाकडच्या ख्याली-खुशालीसाठी खिशात मोबाईलही नाही. शेतमळा आणि घरदाराची चिंता विठ्ठलावर सोडून वारीला निघालेल्या या माऊलीला पाहिल्यावर तुकोबारायांच्या अभंगातील या ओळी सार्थ ठरल्या-‘हेचि दान दे गा देवा,तुझा विसर न व्हावा।गुण गायीन आवडी,हेचि माझी सर्व जोडी।।
।। घातला भार तुझीया माथा न भिये सर्वथा...।।
By admin | Published: June 28, 2017 1:43 AM