पुणे : कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश, गुजरातकडे सरकल्याने राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. देशभरात सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा सुधारित दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. आॅगस्टमध्येदेखील सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडेल.जूनमध्ये वाट बघायला लावणाºया पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. राज्यात सर्वदूर धो-धो बरसलेल्या आषाढसरींनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु, श्रावण सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारली आहे. अजून दहा दिवस तरी पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काहिसे चिंतेचे ढग जमा झाले असतानाच या सुधारित अंदाजाने दिलासा मिळाला आहे.राज्यात गेल्या नऊ दिवसांत नागपूर आणि भंडारा जिल्हा वगळता औरंगाबाद, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागात सरासरीच्या २० टक्के देखील पाऊस झालेला नाही. कोकण विभागात सर्वाधिक ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील पावसाची ओढ अधिक चिंताजनक आहे. औरंगाबाद विभागाची अॅगस्टमधील पहिल्या नऊ दिवसाची सरासरी ५७.३ मिलिमीटर असून, त्या तुलनेत केवळ ५.१ (८.९ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागातही केवळ ७.९ (१३ टक्के) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चिंता नको; पाऊस गाठणार सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:41 AM