तुमच्या घरात आया-बहिणी, सुना नाहीत का?; अजित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 06:08 AM2019-01-30T06:08:47+5:302019-01-30T06:54:13+5:30
प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावले खडेबोल
कागल/ गारगोटी : प्रियंका गांधी राजकारणात आल्यावर तुमचं काय बिघडलं? इशा कोप्पीकर नावाच्या अभिनेत्री भाजपमध्ये गेल्या. त्या भगिनीला वाटलं म्हणून त्या तुमच्या पक्षात आल्या. म्हणून काय टीका करायची आहे. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हे शिकविले नाही. प्रियंका गांधींचा उल्लेख ‘चॉकलेटी चेहरा’ म्हणून करता? तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का? असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोमवारी सकाळी कागलमध्ये आली. त्यानिमित्त येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संग्रामसिंह कोलते-पाटील, माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, संगीता खाडे, वसंतराव धुरे, आदिल फरास, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, सभापती राजश्री माने, नविद मुश्रीफ, भैया माने, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता सभा असूनही मोठी गर्दी झाली होती.
अजित पवार म्हणाले, थापा मारणाºयांमध्ये मोदी-फडणवीस यांचे हात कोण पकडू शकत नाही. समाजसेवक आण्णा हजारे म्हणतात की, ढवळ्याजवळ पवळ्या बांधला वाण नाही गुण तरी लागला. आज केंद्र आणि राज्यातील या भाजप सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहे. आम्हीही काही वर्षे अर्थमंत्री होतो. अंगात धमक असली तरच नडलेल्यांना मदत करता येते. या सरकारमध्ये ती धमक नाही.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ६० वर्षे उभ्या असलेल्या देशातील महत्त्वाच्या संस्था मोडण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. राफेल प्रकरणात आपल्यावर केस दाखल करतील म्हणून मध्यरात्री सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना काढून टाकले गेले. हे देशहिताचे सरकार नाही. बहुजनासाठी घातक असणारे हे सरकार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांचीही भाषणे झाली. स्वागत तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, सूत्रसंचालन प्रवीण काळबर, तर नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आभार मानले.
राज्यावर कर्जाचा डोंगर
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटी रुपये झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणाºया युती सरकारने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे. भाजप मंत्र्यांनी नव्वद हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी मुधाळ येथील सभेत केला.