देहूरोड : समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. रामराज्यात समाज खूप आनंदात व सुखात होता, असे प्रतिपादन श्रीधाम वृंदावन मथुरा येथील पं. आचार्य उत्तम कृष्णशास्त्री यांनी येथे केले. देहूरोड बाजारपेठेतील वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज मंदिराच्या प्रांगणात गेले दहा दिवस सुरू असलेल्या ‘रामकथा महायज्ञा’च्या अंतिम चरणात मेघनाथ, रावण व कुंभकर्ण वध, तसेच राम राज्याभिषेक कथेच्या वेळी शास्त्री बोलत होते. गेल्या सोमवारी मंगल कलशयात्रा व नगरप्रदक्षिणेने भक्तिमय वातावरणात रामकथा महायज्ञाला सुरुवात झाली होती. रामकथा ऐकण्यासाठी देहूरोड परिसरातील भाविकांसह, विशेषत: वैश्य समाज बांधवांची गर्दी अधिक होती. दहा दिवस सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.बुधवारी सकाळपासून मंदिराच्या प्रांगणात महायज्ञ पूर्णाहुती आदी धार्मिक विधी संपन्न झाल्यांनतर व भंडाऱ्याने सोहळ्याची सांगता झाली. दररोजच्या भंडाऱ्यासाठी ( महाप्रसाद ) नरेश अगरवाल, ओमप्रकाश मित्तल अगरवाल, मुकेश व उमेश अगरवाल, कैलास व संदीप गुप्ता, ऊर्मिला बन्सल, सुरेश अगरवाल, ओमप्रकाश अगरवाल, सीतादेवी अगरवाल, नंदकिशोर मित्तल यांनी व्यवस्था केली होती. दहा दिवस परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा व भंडाऱ्याचा लाभ घेतला. श्रीमद्रामकथेदरम्यान विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, तसेच बोर्डाच्या सर्व सदस्यांनी हजेरी लावली. संयोजन वैश्य समाजाचे अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल, डॉ. श्रीनिवास बन्सल, सुमित अगरवाल, अनिल खंडेलवाल, राहुल बन्सल, सुरेशपाल अगरवाल, नीलेश गुप्ता, रामनिवास अगरवाल यांनी केले. ओमप्रकाश अगरवाल, विनोद अगरवाल, सुरेश बन्सल, दिनेश खंडेलवाल आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
श्रीरामांच्या विचारांचे आचरण करावे
By admin | Published: April 29, 2016 2:17 AM