नितीन काळेल- सातारा --महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय मायबाप सरकारनं घेतलाय म्हणे... पण याचा फायदा माण-खटाव अन् फलटणसारख्या खऱ्याखुऱ्या दुष्काळग्रस्तांना होणार नसेल तर काय उपयोग? मराठवाड्यातील जनतेचा विचार करणाऱ्या सरकारने सातारा जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्तांनाही विसरु नये. आम्ही दुष्काळी भागात राहत नाही काय? असा टाहो या बिचाऱ्या लोकांनी फोडलाय. जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे निसर्गाची अवकृपाच. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण तालुके आणि कोरेगावचा काही भाग येथे पर्जन्यमान कमी असते. दोन-तीन वर्षांतून दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. यावर्षीही पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यातील अनेक गावांत आज पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ लोकांवर आली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एकाचवेळी अनेक संकटे उभी राहिली आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळ पडला होता. तसेच दोन-तीन वर्षांतून या तालुक्यांत दुष्काळ ठरलेलाच आहे. आताही तीन वर्षांनंतर दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारली असून, पिकांनी तर मानाच टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस न पडल्यास लोकांना स्थलांतर करावे लागेल. तर शेतकऱ्यांना चारा छावण्यावर आश्रय घ्यावा लागेल, अशी चिन्हे दिसून येऊ लागली आहेत. या तालुक्यातील दुष्काळात खऱ्याअर्थाने भरडून निघतो, तो शेतकरी. जनावरे जगवायची अन् आपण जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तीन वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. त्यावेळी माणमधील अर्धा तालुका छावणीवर होता. शेतकऱ्यांना बेंदरापासून अनेक सण या छावणीवरच साजरे करावे लागले होते. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाची ससेहोलपट झाली होती. तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात खटाव तालुक्यात तर पाण्याचे संकट निर्माण झाले होते. गावोगावी पाण्याचे टँकर फिरत होते. पण, पाणी कधीच लोकांना पुरेसे मिळाले नाही. कळशीभर पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू होती. बॅरलभर पाणी विकत घ्यायचे झालेतर १०० रुपये मोजावे लागत होते. अशीच स्थिती माण, फलटण, कोरेगावमधील लोकांची झाली होती. शेतकऱ्यांना जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागली होती. यावर्षी दुष्काळी तालुक्यांत उन्हाळी एक-दोन पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्याच्या प्रारंभी काही गावांत बऱ्यापैकी पाऊस झाला. पण, अर्ध्याहून अधिक गावांत पावसाने हुलकावणीच दिली होती. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नाही, हे निश्चित झाले होते. ज्या गावांमध्ये पाऊस झाला होता. तेथील शेतकऱ्यांनी आहे त्या ओलीवर बाजरी, मटकी, मूग व इतर पिकांची पेरणी केली. पण, आता या पेरणीला जवळपास दोन महिने होत आले. तरीही पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे अल्पशा ओलीवर उगवलेली पिके माना टाकू लागली आहेत. एखादी पावसाची सरही ही पिके वाचवू शकते; पण सध्या पावसाचे पडणे अवघड होऊन गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आशाळभूत नजरेने आभाळाकडे बघण्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे पिके वाया जाणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी खर्च केलेले पैसेही मिळणार नाहीत. त्यामुळे बळीराजांवर आता दुहेरी संकट येऊन ठेपले आहे.सध्या आॅगस्ट महिना सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत येथील जनेतला व शेतकऱ्यांना पावसाची आशा आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्यास दुष्काळाचे संकट अधिक गहिरे होत जाणार आहे. कारण, आताच अनेक गावांत पिण्यासाठी लोकांना पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. रानात चारा उगवला नाही. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने मरठवाड्यात छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे येथेही छावण्या सुरू करण्याची गरज आहे. माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या तालुक्यातील ६० टक्क्याहून अधिक गावांत पाऊस झालेला नाही. आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी चुकीची पीक आणेवारी दाखविण्यात आलेली आहे. येथे शासनाने छावण्या द्याव्यात.- जयकुमार गोरे,आमदार, माण-खटावजून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली आहे ती आतापर्यंत. सप्टेंबरपर्यंत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर आभाळ कोसळणार आहे. कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि जनावरे कशी जगावायची हा प्रश्न आहे. - धोंडिराम खिलारी, शेनवडीपूर्व भागातील रानवडी पिके गेली करपून ...जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यात माळरान अधिक आहे. या तालुक्यात सिंचनाचे जाळे अद्यापही निर्माण झालेले नाही. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. या माळरानावर मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर पिके घेण्यात येतात. त्यामध्ये बाजरी, मटकी, हुलगा व इतर कडधान्ये घेण्यात येतात. यंदा अनेक ठिकाणी पेरणी झाली आहे. पण, सध्या पाऊस नसल्याने ही पिके वाळून जावू लागली आहेत. ‘पावसाची आकडेवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी...जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुके तसेच कोरेगावचा काही भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. या तालुक्यात आतापर्यंत अल्पसाच पाऊस झालेला आहे. येथील पावसाची आकडेवारी अशी :दरवर्षी साधारणपणे जून ते आॅक्टोबरपर्यंत माणमध्ये सरासरी ४४२ मिमी पाऊस होतो. तर आॅगस्टअखेरपर्यंत २०० मिमी होतो. यावर्षी दि. १० आॅगस्टपर्यंत फक्त १२५ मिमी पाऊस झालेला आहे. फलटणची सरासरी सुमारे ४०० मिमी असून, आॅगस्टअखेरपर्यंत १९० मिमी पाऊस पडतो. सध्या ९२ मिमी पाऊस झालेला आहे. खटाव तालुक्याची सरासरी ४१५ असून, आॅगस्टअखेरपर्यंत २१६ मिमी पाऊस होतो. यंदा १३५ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. यावरूनच असे दिसून येते की दुष्काळी भागात पाऊस कमी आहे. त्यामुळे यापुढे पाऊस न झाल्यास दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. कर्जाचे पुनर्गठन महत्त्वाचे...दुष्काळी भागातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांवर सोसायट्या व बँकांचे कर्ज असते. वर्षानुवर्षे हे सुरू आहे. शेतकरी दरवर्षी कर्ज काढतो आणि फेडतो. आताच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, गावोगावच्या सोसायटी, बँकात चौकशी केल्यावर तसा आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
आम्ही दुष्काळी भागात राहत नाही काय?
By admin | Published: August 12, 2015 8:47 PM