NCP Ajit Pawar ( Marathi News ) : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारानिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी बनावट शिवसेना असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यंदाची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध ठाकरे अशी आहे आणि मोदी जिथे-जिथे प्रचाराला जातील, तिथं तिथं भाजपचा पराभव होईल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाचार घेतला आहे.
संजय राऊत यांची खिल्ली उडवत अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "मोदी विरुद्ध ठाकरे अशी लढाई आहे, हे तुम्हाला तरी हे पटतं का? ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, असं ते म्हणाले असते तर एकवेळ मान्य केलं असतं. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरेंचा प्रभाव नाही. बोलण्याचा अधिकार आहे म्हणून काही जण काहीही बोलतात. किमान लोकांना पटेल असं तरी बोलावं," अशा शब्दांत अजित पवारांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
शरद पवारांनाही दिलं प्रत्युत्तर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीतील दुष्काळी भागाचा दौरा करत नागरिकांसोबत संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांच्या धमक्यांना घाबरू नका, असं आवाहन केलं. शरद पवारांच्या या टीकेवर अजित पवारांनी आज स्पष्टीकरण दिलं. "तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता. अशा पद्धतीने धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. असे करायचे नसते. संस्था चालवताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते व राजकारण करताना राजकारणाच्या पद्धतीने करायचे असते. जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी. पोलीस त्याबाबतची चौकशी करुन कार्यवाही करतील," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.