महेश झगडे, माजी प्रधान सचिव, अन्न व औषध प्रशासन विभाग -
अलीकडेच अन्न आणि औषध प्रशासनाने मॅकडोनाल्ड या आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या कंपनीच्या अहमदनगर येथील आऊटलेटमध्ये चीजऐवजी चीजसदृश (ॲनालॉग) पदार्थ वापरून ग्राहकांची फसवणूक केल्याचे कारण दाखवून त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तामुळे जनसामान्यांत अनेक तर्कवितर्क केले जात असून मॅकडोनाल्ड विक्री करीत असलेल्या त्यांच्या बर्गर आणि नगेटमध्ये वापरले जाणारे चीजसदृश (ॲनालॉग) पदार्थ शरीराला अपायकारक आहे की काय, येथपासून ते या कारवाईमागे इतर काही काळेबेरे तर नाही ना अशा शंका घेतल्या जात आहेत.
एक महत्त्वाची बाब म्हणजे मॅकडोनाल्ड कंपनी हा जागतिक ब्रँड असल्याने ती कंपनी चुका करणारच नाही हा गैरसमज काढून टाकला पाहिजे, कारण अशा व्यावसायिकांचे मुख्य लक्ष हे नफा कमविण्याकडे असते आणि तसे करताना आरोग्याची काळजी घेतली जातच असेल असा विश्वास ठेवणे गैरवाजवी ठरेल. इतर व्यवसायाप्रमाणेच अन्न व्यवसाय देखील अर्थार्जनाचे एक मोठे साधन असून कच्चामाल निर्मिती ते अन्नाचे प्रक्रिया उद्योग, रेडिमेड अन्न, खाद्यगृहे, अन्नाची आयात-निर्यात इत्यादींची वार्षिक उलाढाल सुमारे दहा ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ तिप्पट इतकी प्रचंड मोठी आहे आणि ती दरवर्षी वाढतच आहे. यामध्ये सर्वांत मोठी वाढ ही रेडिमेड अन्न आणि खाद्यगृहे यामध्ये दिसून येते. त्यामुळे या व्यावसायिक अन्नाची गुणवत्ता चांगली असावी व ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्व देशात कायदे तयार करण्यात आले असून भारतातसुद्धा अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ हा अत्यंत प्रभावी कायदा २०११ पासून लागू करण्यात आलेला आहे. अन्नाची गुणवत्ता राखली जावी व ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरण आणि प्रत्येक राज्यात अन्नसुरक्षा आयुक्त व त्यांची सर्वदूर पसरलेली यंत्रणा नियुक्त झालेली असते. त्यांचे काम म्हणजे ग्राहकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे व गैरप्रकारांविरुद्ध कठाेर कारवाई करून अन्नामध्ये कोणतेही चुकीचे प्रकार टाकण्यास कोणीही धजावणार नाहीत याबाबत काळजी घेणे.
मॅकडोनाल्ड कंपनीविरुद्ध झालेली कारवाई भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीप्रकरणी नव्हे तर ग्राहकांची दिशाभूल केल्याने झालेली आहे. अन्न व्यावसायिकांना कायद्याच्या कक्षेत राहून ते त्यांचे अन्नपदार्थ काय असावेत ते ठरवू शकतात. त्यांचे ब्रँडिंग करू शकतात फक्त अट ही आहे की, पदार्थांची खरीखुरी माहिती त्यांनी ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. अन्नाची विक्री करताना वेष्टने, माहिती-पत्रक (मेन्यू), लेबल्स, नावे, जाहिरातीत किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपलब्ध केली जाणारी माहिती सत्यच असावी. त्याचबरोबर त्यांची खरी माहिती द्यावी. अन्न पदार्थांचे वजन, ते किती कालावधीपर्यंतच सेवनास योग्य, त्यामधून किती कर्ब, प्रथिने, स्निग्न पदार्थ इत्यादी उपलब्ध होतील व किती उष्मांक त्याच्यामध्ये सामावलेले आहेत, त्याप्रमाणे बहुतेक अन्नपदार्थांची गुणवत्ता काय असावी हे नियमान्वये ठरवून दिलेले आहे. नियमनाद्वारे बहुतेक अन्न पदार्थांची मानके विहित केली असून ते पदार्थ त्याप्रमाणे नसतील तर आस्थापना निलंबित करणे, लायसन्स रद्द करणे, दंड आकारणे, कैदेची शिक्षा आदी कारवाया प्रशासन आस्थापनाविरुद्ध करू शकतात.