ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का ? ते 18 तारखेला समजेल. शिवसेनेकडून राजीनाम्याचं नाटक केले जात आहे असे मत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी एबीपी माझा कट्टयावर बोलताना व्यक्त केले. 'शिवसेनेचे मंत्री कामाचे नाहीत हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलं आहे त्यामुळे ते राजीनाम्याची भाषा करत आहेत', असे नारायण राणे बोलले आहेत.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये शिवसेनेची सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवणार अशी चर्चा आहे. 'शिवसेना सत्तेमधून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेणार नाही', असे मत राणेंनी व्यक्त केले.
'शिवसेनेमध्ये काहीजणांना मंत्रीपद न मिळाल्याने अस्वस्थतता आहे. शिवसेनेचे जवळपास 20 आमदार नाराज आहेत', असेही त्यांनी सांगितले. 'आपले सरकार पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगतात. याचा अर्थ शिवसेनेचे काही आमदार त्यांच्या गळाला लागले आहेत किंवा, शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याची व्यवस्था त्यांनी केली आहे', असे राणे म्हणाले.