Amol Kolhe vs BJP: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. यावर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चेही आयोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील दिले आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरून भाजपाने त्यांना सवाल केला आहे.
"राष्ट्रवादीचे खा अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का? हा तर राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहराच पुन्हा एकदा समोर आला," असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी कोल्हे यांच्या भूमिकेवर टीकाही केली आहे.
अमोल कोल्हेंचा कार्यक्रमावर बहिष्कार का?
शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. मात्र त्यात बरोबर शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेकांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार टाकणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असताना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरुपी फडकवला नाही. २०२१ पासून अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे. मात्र अद्यापही ही मागणी पू्र्ण न केल्याने ही भूमिका घेतल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.