ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 27 - महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणाचा विषय शरद पवार यांच्या नावाला स्पर्श केल्याखेरीज पुढे सरकत नाही. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस कारकिर्दीस 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल नांदेड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार तथा स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांची उपस्थितीत होती. यावेळी केशवरावांनी त्यांच्या शैलीप्रमाणे शरद पवार यांचा भर व्यासपीठावर मुका घेतला. त्यानंतर भाषणामध्ये शदर पावर यांच्यावर सडेतोड टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यात किती आणि कोणते अवगुण आहेत सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते. मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्याच्या मागणीसाठी शरद पवारांनी फिरवाफिरवी केली. पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते त्यांनाही पवारांनी बुडवले. आणीबाणीच्या काळात पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्र बदलले असते. पण पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पवार सत्तेला चिकटून बसले, असा हल्लाबोल केशवराव धोंडगे यांनी पवारांच्या उपस्थितीत केला. पवारांना एवढ्या डिलिट पदव्या मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का, असा टोमणाही धोंडगेंनी यावेळी लगावला.पुढे बोलताना धोंडगे म्हणाले, शरद पवार यांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार माणसं फोडण्यात अत्यंत कुशल आहेत. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करु शकत नाही. पवार म्हणजे बिना चिपळ्याचे नारदच आहेत. यावेळी बोलताना धोंडगे यांनी शरद पवार यांच्या राजकीय कामाचे कौतुकही केले, शरद पवार हे संसदीय कामकाजातील कोहिनूर आहेत त्यांना राष्ट्रपती बनवण्यात यावे असेही ते म्हणाले.
डिलिट पदव्यांचे पवार लोणचे घालणार का? - धोंडगे
By admin | Published: February 27, 2017 1:56 PM