ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. २७ - मागच्या आठवडयात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर डॉक्टर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने हादरले होते. या प्रकरणात सांगली पोलिसांनी नर्स सीमा यादव आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली आहे. मागच्या रविवारी डॉ. प्रकाश कुलकर्णी (६५) आणि त्यांच्या पत्नी अरुणा कुलकर्णी (५८) रहात्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या.
अज्ञात मारेक-यांनी धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांची हत्या केली होती. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा त्यांना कुलकर्णी दाम्पत्याचे व्यक्तीगत पातळीवर कुणाबरोबरही वैर, शत्रूत्वाचे संबंध नसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचा जवळच्या माणसांवर संशय होता. सीमा यादव डॉ. कुलकर्णींच्या क्लिनकमध्ये नोकरीला होती. तिची मागच्या तीन-चार दिवसांपासून कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी तिला आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली.
या हत्येमध्ये आणखी एक तिस-या व्यक्तीचाही सहभाग आहे. पोलिसांनी या तपासाबाबत सुरुवातीपासून गुप्तता बाळगली होती. हे दुहेरी हत्याकांड नेमके कोणत्या उद्देशाने झाले ते अद्यापही पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. डॉ. प्रकाश कुलकर्णी फिजिशिअन तर, त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ञ होत्या.