मुंबई : गेल्या काही वर्षांत डॉक्टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध बदलेले आहेत. डॉक्टरांवर हल्ले होतात, पण डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गरज पडल्यास ‘पोलीसिंग महाराष्ट्र’ नावाचे अॅप्लिकेशन आहे. यावर सर्व हेल्पलाइन्स उपलब्ध आहेत, डॉक्टर याची मदत घेऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले. शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय दंत महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी दीक्षित यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार, प्र. सहसंचालक सुरेश बारपांडे, निवेदक प्रदीप भिडे उपस्थित होते. शासकीय दंत महाविद्यालयाचे नाव व परंपरा लक्षात घेता या महाविद्यालयाने देशातील विविध दंत महाविद्यालयांच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी. मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या महाविद्यालयाचा संपूर्ण देशात नावलौकिक आहे. महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांनाही माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन रुग्णांची सेवा करावी, असे आवाहनही दीक्षित यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हे महाविद्यालय चांगले असून, विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घेऊन त्या सोडवल्या जातात. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने स्थानिक पालकत्व योजना सुरू केली आहे. आॅर्थर रोड कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य सेवा योजना सुरू करण्यात आल्याचेही शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डॉक्टरांनी सुरक्षेसाठी ‘पोलीस अॅप’ वापरावे
By admin | Published: August 04, 2016 1:45 AM