लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कोविड उपचार केंद्रात आलेल्या रुग्णास खाजगी रुग्णालयात पाठवल्या प्रकरणी त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे . तर खाजगी रुग्णालयात गेलेल्या त्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी पालिकेने त्या रुग्णालयास नोटीस बजावली आहे .
मीरा भाईंदर महापालिकेने इंद्रलोक भागातील प्रमोद महाजन सभागृहात असलेल्या कोविड उपचार केंद्रात २८ ऑक्टोबर रोजीच्या सायंकाळी राघवेंद्र विनोद मिश्रा (२१ ) ह्या तरुणास उपचारासाठी दाखल केले होते . डॉक्टरांनी त्याचे सिटीस्कॅन केल्या नंतर तपासणी अंती मीरारोडच्या गॅलॅक्सी ह्या खाजगी रुग्णालयात पाठवले . तेथे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातलगांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप करत मृतदेह घेण्यास नकार दिला होता .
नातलगांच्या आक्षेपा नंतर आता पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रकाश जाधव यांनी गॅलॅक्सी रुग्णालयास नोटीस बजावून मिश्रा यांच्या मृत्यू प्रकरणी हलगर्जीपणाचा खुलासा करावा असे सांगत रुग्णालयाची नोंदणी रद्द का करू नये ? अशी नोटीस बजावली आहे .
तर पालिका उपचार केंद्रात दाखल रुग्णास विशेष उपचाराची गरज असताना त्याला मोठ्या सरकारी रुग्णालयात पाठवण्याची शिफारस करण्या ऐवजी खाजगी रुग्णालयात पाठवले म्हणून चौकशी होई पर्यंत डॉ. मोहम्मद आवेश हरून रशीद कोलाड यांच्यावर निलंबनाची कारवाई डॉ . जाधव यांनी केली आहे.