मुंबई : मुंबई शहर-उपनगरातील रुग्णालयांत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे अपुरे मनुष्यबळ हीसुद्धा समस्या आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अधिक गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा देण्याकरिता आणि डॉक्टरांवरील हल्ले कमी करण्यासाठी महापालिकेने पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये यंदा डॉक्टरांची ८१२, तर परिचारिकांची ५८२ पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदही करण्यात आली आहे, त्यामुळे भविष्यात रुग्णसेवा अधिक बळकट होईल.गोरगरीब जनतेला व सर्वसामान्यांना अधिक व्यापक स्तरावर वैद्यकीय सेवा-सुविधा देता याव्यात यादृष्टीने महापालिकेची १६ उपनगरीय रुग्णालये कार्यरत आहेत. यापैकी ८ रुग्णालये ही पूर्व उपनगरांमध्ये, तर उर्वरित ८ रुग्णालये ही पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. सध्या या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३ हजार ५०४ खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयांमधील सध्याची रिक्त पदे, खाटांची संख्या इत्यादी बाबी लक्षात घेऊन या सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची एकूण ८१२ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरांमधील वांद्रे पश्चिम परिसरातील ४३६ खाटांच्या खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालयामध्ये डॉक्टरांची ७६ पदे; तर सांताक्रूझ पूर्व परिसरातील २५९ खाटांच्या विष्णुप्रसाद नंदराय देसाई महापालिका रुग्णालयात ६८ पदे भरण्यात येणार आहेत. गोरेगाव पश्चिम परिसरातील १७२ खाटांच्या सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टरांची ४७ पदे; तर मालाड पूर्व परिसरातील ५० खाटांच्या स. का. पाटील रुग्णालयात १५ पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.मालाड पूर्व परिसरातील १८० खाटांच्या म.वा. देसाई रुग्णालयात डॉक्टरांची ५० पदे; तर कांदिवली पश्चिम परिसरातील ४२७ खाटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये ९२ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बोरीवली पश्चिम परिसरातील ११० खाटांच्या हरिलाल भगवती रुग्णालयात डॉक्टरांची २९ पदे; तर बोरीवली पूर्व परिसरातील १०५ खाटांच्या कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांची ३५ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.कुर्ला पश्चिम परिसरातील ३०६ खाटांच्या खान बहादुर भाभा रुग्णालयात डॉक्टरांची ६१ पदे; तर चेंबूर परिसरातील ७४ खाटांच्या ‘माँ’ रुग्णालयात २३ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवंडीतील २१० खाटांच्या पं. मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांची ६३ पदे; तर घाटकोपर येथील ५९६ खाटांच्या राजावाडी रुग्णालयात १०५ पदे भरण्यात येणार आहेत. घाटकोपर पश्चिम परिसरातील १०९ खाटांच्या संत मुक्ताबाई रुग्णालयात डॉक्टरांची ४६ पदे; तर विक्रोळी पूर्व येथील १४० खाटांच्या क्रांतिवीर म. जोतिबा फुले रुग्णालयात २६ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुलुंड पूर्व परिसरातील १०५ खाटांच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर रुग्णालयात डॉक्टरांची २९ पदे; तर मुलुंड पश्चिम परिसरातील २२५ खाटांच्या श्रीमती मानसादेवी तुलसीदास अगरवाल रुग्णालयात ५१ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे (माध्यमिक आरोग्य सेवा) खातेप्रमुख व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)परिचारिकांची एकूण ५८२ पदे २०१७-१८ साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी विविध तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ८१२ पदे भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यात २७४ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, १०३ निवासी अधिकारी, ७८ प्रबंधक, २८७ वरिष्ठ प्रबंधक आणि ७० साहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये एकूण ५८२ परिचारिकांची पदे यंदाच्या आर्थिक वर्षात भरण्याचेदेखील प्रस्तावित करण्यात आले आहे.
डॉक्टरांची ८१२ पदे भरणार
By admin | Published: April 11, 2017 3:25 AM