मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. स्टेट गेस्ट म्हणून फडणवीस यांना जपानकडून निमंत्रण देण्यात आले होते. आता जपानच्या कोयासन विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर केली आहे. कोयासन विद्यापीठाने त्याबाबत घोषणा केली.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. आज कोयासन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सोएदा सॅन यांनी घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये फडणवीसांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील डॉक्टर देवेंद्र फडणवीस म्हणून ओळखले जातील.
तर कोयासन विद्यापीठाने फडणवीसांना डॉक्टरेट आता जाहीर केली. परंतु मला लग्न झाल्यापासून ते डॉक्टरच आहेत हे माहिती होते. ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत अशा शब्दात पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस ५ दिवसीय जपान दौऱ्यावर आहेत. जपान दौऱ्यात फडणवीस तिथल्या पायाभूत सुविधा, पब्लिक ट्रान्सपोर्ट, महाराष्ट्रासाठी परदेशी गुंतवणूक याबाबत विविध बैठका घेणार असून जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
‘लेटर ऑफ अॅप्रिसिएशन’याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अॅप्रिसिएशन’ आज दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून जपान दौर्यावर गेले असता त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. आज पुन्हा विद्यापीठात गेले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रार्थनाही झाली.
कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो यांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मानद डॉक्टर
अलीकडेच नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली होती. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी ही मानद उपाधी कुलपती डॉ. विजय पाटील यांनी प्रदान केली होती. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळमधील महापूर, महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य, कोल्हापूर, महाड येथील पुरावेळी कार्य अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कार्यासाठी शिंदे यांना गौरवण्यात आले होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डॉक्टरेट जाहीर झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनाही मानद डॉक्टर म्हणून नवी ओळख मिळाली आहे.