खामगाव (जि. बुलडाणा) : अवैध सावकारीप्रकरणी खामगाव येथील डॉ.अशोक टावरी यांना मंगळवारी खामगाव येथील न्यायालयाने सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली. अवैध सावकारीच्या तक्रारीवरुन डॉ.टावरी यांच्या रायगड कॉलनीस्थित निवासस्थानी १७ नोव्हेंबर २00९ रोजी सहाय्यक निबंधक दिपक ठाकूर यांच्यासह पथकाने छापा टाकला. या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे व अवैध सावकारीचे काही पुरावे हाती लागले होते. दरम्यान, डॉ.टावरी हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार अरुण अघडते यांच्यासह चौघांनी केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. टावरी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. डॉ. टावरी यांच्या घराची झडती घेतली असता सुमारे १ कोटी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे आणि सावकारीविषयक पुरावे जप्त करुन डॉ.टावरी आणि गोंधनापूर येथील निलेश केनेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात डॉ.टावरी यांच्याविरुध्द अवैध सावकारीचा गुन्हा सिध्द झाला. सरकार पक्षातर्फे यावेळी १७ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब याआधारे न्यायालयाने डॉ. टावरी यांना ६ महिने साधी कैद आणि १५00 रुपये दंड, तसेच कलम ३३ अन्वये ३ महिने साधी कैद व ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. छाप्यामध्ये सापडलेले कोरे धनादेश, चिठ्ठय़ा, स्टॅम्पपेपर, मुखत्यारपत्र, सौदाचिठ्ठी असे जवळपास ३00 दस्ताऐवज आव्हान याचिका दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर नष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
अवैध सावकारी करणा-या डॉक्टरास कारावास
By admin | Published: June 10, 2015 2:09 AM