पुणे : वैद्यकीय क्षेत्रात सध्या निराशा दाटून आली असून, या पेशाविरोधात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. वैद्यकीय सेवेतील बाजारूपणा आणि चुकीच्या प्रवृत्तींमुळे नागरिक आणि डॉक्टरांमधील अविश्वासाची दरी वाढत आहे. या स्थितीत बदल करण्यासाठी चांगला व्यवसाय करणारे डॉक्टर आणि नागरिक यांनी एकत्र आले पाहिजे, असा सूर व्यक्त करीत डॉक्टरांनीच वैद्यकीय क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींविरोधात एल्गार पुकारण्याची शुक्रवारी हाक दिली. पुणे सिटीझन डॉक्टर फोरमची व ६६६.ेी्िरें्र३१ं.ङ्म१ॅ या संकेतस्थळाचे उद््घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर उत्तम वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची नावे देण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांकडूनच अभिप्राय मागविण्यात आले आहेत. अॅड. असिम सरोदे, डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके, डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे या वेळी उपस्थित होते. समाजाची नैतिकता आज अल्पसंख्याक झाली आहे. पैसा आणि गुंडगिरीचीच अरेरावी आहे. वैद्यकीय क्षेत्रात आज जे निराशेचे वातावरण आहे, त्याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. पूर्वी रुग्ण आणि डॉक्टरांचा परस्परांवर विश्वास होता. आज चंगळवादी वृत्तीने हा विश्वास नाहीसा झाला आहे. विश्वासाचे हे वातावरण वाढावे यासाठी स्थानिक पातळीवर विश्वास वाढायला हवा. त्यासाठी सरकारी धोरणेदेखील बदलायला हवीत. आरोग्यावर अधिक खर्च केला पाहिजे. चुकीच्या कारणांमुळे वैद्यकीय क्षेत्र चर्चेत आहे. मात्र, इतर व्यवसायांप्रमाणेच यात चांगले, वाईट आणि कुरूप प्रवृत्ती आहेत. मात्र, नकारात्मक वृत्तांमुळे त्याचा संपूर्ण व्यवसायावर परिणाम होतो. डॉक्टरांनी आपल्या पेशाविषयी एक जाड पडदा निर्माण केल्यास त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक होतील. काही रुग्णालये एकाच शस्त्रक्रियेचे विमा असेल तर वेगळे बिल आणि नसेल तर वेगळे बिल लावतात. असे कसे होते? अशा स्वरूपाचे अनेक अनुभव रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना येत असतात, असे आगाशे म्हणाले. डॉक्टरांनाच आपल्या क्षेत्राविषयी अधिक माहिती असते. त्यांनाच दुष्कृत्य करणाऱ्यांची माहिती सर्वांच्या आधी होत असते. त्यामुळे साहजिकच त्याविरोधात लढण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच येते, असे अॅड. सरोदे म्हणाले. (प्रतिनिधी)वैद्यकीय सेवा बाजारात उभी डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील निराशा वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय पेशा एक व्रत म्हणून करणारे डॉक्टरदेखील, आपल्याला कधीही मारहाण होऊ शकते, अशा भीतीदायक वातावरणात वावरत आहेत. डॉक्टरांवर विश्वास राहिला नसल्याने अशी स्थिती झाली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्र बाजारात उभे राहिल्यासारखी स्थिती आहे. गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी डॉक्टर आणि नागरिकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असे डॉ. अरुण गद्रे यांनी सांगितले.
कट प्रॅक्टिसविरोधात डॉक्टरांचा एल्गार
By admin | Published: April 08, 2017 1:23 AM