अकोला: मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या विविध मागण्या २0११ मध्येच शासनदरबारी मंजूर करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने संघटनेच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या डॉक्टरांना राज्य शासनाने मेस्मा लावण्याचे आदेश दिले असून, अकोल्यातील डॉक्टरांनी या आदेशाची रविवारी दुपारी होळी केली. यासोबतच शासनाने फौजदारी कारवाई केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या नवीन कुठल्याही मागण्या नसून, ज्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, यासाठी मॅग्मो संघटनेच्यावतीने डॉक्टर्स डे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मॅग्मो संघटनेचे डॉक्टर जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनास बसले असून, त्यांना आ.डॉ. रणजित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेट दिली. डॉक्टरांचे मुंबईतील आझाद मैदानावरदेखील आंदोलन सुरू असून, त्या ठिकाणच्या डॉक्टरांवर रविवारी सायंकाळपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र मेस्मा लावण्याचे आदेश या डॉक्टरांना प्राप्त झाले असून, अकोल्यातील डॉक्टरांनी या आदेशाची होळी केली. यासोबतच फौजदारी कारवाईसही तयार असून, अशा कारवाईचा बडगा शासनाने उगारल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचाही इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात डॉ. विजय जाधव, डॉ. प्रमोद रक्षमवार, डॉ. उज्ज्वला पाटील, डॉ. उमाकांत गरड, डॉ. अश्विन पाटील, डॉ. राजेश गायकवाड , डॉ. भावना हाडोळे यांच्यासह मॅग्मो संघटनेचे डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत
. ** सीएस, डीएचओ व डीडी संघटनेचा पाठिंबा
मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांनी मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास आरोग्य उपसंचालक संघटना, जिल्हा शल्य चिकित्सक संघटना व जिल्हा आरोग्य अधिकारी या तीनही संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव यांनी दिली. या तीनही संघटना या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून, त्यामुळे हा बेमुदत संप चिघळण्याची शक्यता आहे.
** मेस्मा कार्यवाही न करण्याची मागणी
अकोला: आंदोलनात सहभागी वैद्यकीय अधिकार्यांवर ह्यमेस्माह्ण कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटनेचे (मॅग्मो-आयुर्वेद) डॉ. विजय जाधव यांनी रविवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभगाच्या प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन, तोडगा काढावा, असेही डॉ. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.