तळोजा : नवी मुंबई येथील कामोठा परिसरात राहणाऱ्या एका ५८वर्षीय डॉक्टरने २७वर्षीय तरुणीला नाहक त्रास देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पंकज गोपाळराव पाटील (५८) असे या डॉक्टरचे नाव आहे. कळंबोली परिसरातील एका हॉस्पिटलमधील कर्मचारी असलेल्या या तरुणीला गेल्या १५ दिवसांपासून त्रास होत असल्याचे उघड झाले आहे. कळंबोली येथील एका हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त पाटील आला असता अनोळखी तरुणीसोबत कुणीही नसल्याचे पाहून त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने प्रतिकार केला असता तिला तुझी बदनामी करेन, असे धमकावून तेथून पळ काढला. पीडित तरुणीने आपल्या विश्वासातील माणसांना हा प्रकार सांगितला, त्यानंतर तो तिला व्हॉटस्अॅपवर अश्लील चित्रफिती, फोटो, एसएमएस पाठवू लागला. पंकज हे कळंबोली एमजीएम (हाय-वे) येथील दवाखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. पंकजकडून सातत्याने तरुणीला त्रास दिला जात असल्याने तिने दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ‘डॉ. पंकज पाटील याला अटक झालेली होती. आता तो कोर्टातून जामिनावर सुटलेला आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराव मोहिते यांनी दिली.
तळोजा येथे डॉक्टराने केला तरुणीचा विनयभंग
By admin | Published: January 19, 2015 4:38 AM