अहमदनगर : महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा वारसा असून, सर्व जाती, धर्मातील संतांनी समाजप्रबोधनाचे व्यापक कार्य केले़ संतसाहित्य आणि विचाराने समाजाला सहिष्णुतेची शिकवण दिली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ़ यु़ म़ पठाण यांनी व्यक्त केले़ जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडारच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते़ न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे होते़ पठाण म्हणाले, सध्या समाजातील असहिष्णुतेमुळे साहित्यिक पुरस्कार परत करत आहेत़ मात्र, हे पुरस्कार त्यांना यापूर्वीच्या शासनकाळात मिळालेले आहेत़ तरीही समाजातील एकूणच परिस्थतीविरोधात साहित्यिकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे़ बदलत्या काळानुसार पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू मराठवाड्याकडे सरकत आहे़ चौथे छत्रपतींच्या नावाने साहित्यिकांना पुरस्कार दिल्याने त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, नवोदितांना यातून प्रेरणा मिळेल़ एकेकाळी शासनाकडून त्याच त्या लोकांना पुरस्कार दिले जात होते़ आता मात्र, त्यात बदल झाला असून, ही एक चांगली बाब आहे. डॉ़ सदानंद मोरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने त्याकाळी मराठी जनतेला मोघल साम्राज्याविरोधात लढ्याची प्रेरणा मिळाली होती़ पुरस्काराचा हा उपक्रम छत्रपतींचा इतिहास पुढे नेईल़ (प्रतिनिधी)पुरस्काराचे मानकरीडॉ़ यु़ म़ पठाण व डॉ़ सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ़ खंडेराव शिंदे, डॉ़ राजशेखर सोलापुरे, जयद्रथ जाधव, कवी बाबासाहेब सौदागर, हनुमंत चांदगुडे, डॉ़ संजय कळमकर, डॉ़ बालाजी जाधव यांच्यासह नटवर्य रंगा कामत यांना मरणोत्तर जिल्हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला़
संतविचारांतून सहिष्णुतेची शिकवण
By admin | Published: December 26, 2015 12:51 AM