बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण, मारिओ मिरांडा अशा अनेक दिग्गज कार्टुनिस्टनी भारतातील व्यंगचित्र कलेचे दालन समृद्ध केले. बाळासाहेबांची दखल तर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर घेतली गेली. भारतीय कार्टुनिस्टची लघुपटांच्या माध्यमातून दखल घेऊन त्यांचे कार्य आणि कर्तृत्व यांचा ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपण्याचे काम ‘दूरदर्शन’ने करून ठेवले आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘दूरदर्शन’ने देशातल्या १३ कार्टुनिस्टवर लघुपटांची निर्मिती केली. अर्ध्या तासाच्या एकेका लघुपटातून अमूल्य ठेवा निर्माण झाला आहे. हैदराबादच्या संकू यांनी या निर्मितीचे संकलन-संपादन केले. २000 साली तयार करण्यात आलेल्या या लघुपटांमधून शंकर पिल्ले, आर.के. लक्ष्मण, मारिओ मिरांडा, विन्स, उन्नी, गोपुलू, बापू, अबू अब्राहम, सुरेश सावंत आणि प्रभाकर वाईरकर यांच्या कामाचा आणि कलात्मक आयुष्याचा वेध घेतला गेला.यापैकी प्रभाकर वाईरकर हे कार्टुनिस्ट कंबाइन वेल्फेअर असोसिएशनची धुरा वाहत आहेत, तर सुरेश सावंत जागतिक पातळीवरील ख्यातनाम कार्टुनिस्ट आहेत. ‘विटी वर्ल्ड’ या अमेरिकन कार्टुन मॅगझिनचे इंडिया एडिटर म्हणून काम पाहिलेल्या सावंत यांनी देशोदेशी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.