संभाजी भिडे यांचे महापुरुषांबद्दलची विधाने अवमानकारक असतात. भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे, असे पटोले म्हणाले.
सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी लावणार का? भीमा कोरेगाव घटना घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते. दोन तीन दिवसांत भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही विधिमंडळात हे प्रश्न उचलू असा इशारा पटोले यांनी दिला.
भाजप भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचा मणिपूर करू पाहत आहे का? नरेंद्र मोदी खाजगी पुरस्कार स्वीकारत आहेत. मोदी हे पुरस्कार स्वीकारून पंतप्रधान पदाचा अवमान करत आहेत. काँग्रेस भाजपाविरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) यांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे. मात्र, दुसऱ्या पक्षांनी काय करावे? हे त्यांनीच ठरवायचे आहे, असे पटोले म्हणाले.
नागपुरात विकासाच्या नावावर शहर भकास केले. भाजपने नागपुरात झाडे कापली, सौंदर्य नष्ट केले. मला चंद्रपूर माहीत आहे. गेल्या दोन वर्षांत पूररेषा ओलांडून एकही घर बांधलेले नाही. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाचे बांध बांधले, त्यामुळे महाराष्ट्रात पूर येत आहे. नाणार जवळ अनेकांनी जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. नानार प्रकल्प या ठिकाणीच होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुजरातमधील लोकांनी तिथे जमिनी घेतल्या आहेत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हे प्रकार आहे. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांचे नाव शासनाने जाहीर करावे. त्यांच्याकडे यादी आहे, असे पटोले म्हणाले.
- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ही लोकं सुरक्षित नाहीत. नागपुरात एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे, त्यांची परीक्षा घेऊ नका. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी यांना निधी दिले नाहीत, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला.