आश्वी (जि. अहमदनगर) : निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला फिरकलेही नाहीत. आता स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येत आहात तर, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.निमगावजाळी व प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात विखे म्हणाले, सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली आहे. पण आवश्यक उपाययोजना करायला सरकारकडून चालढकल होत आहे. उलट चुकीची परिपत्रके काढून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे. राज्यात पावसाअभावी मोठे चिंतेचे वातावरण आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, शेडनेटसाठी अनुदान दिले होते. मात्र या सरकारने हे अनुदान विनाकारण रखडविले आहे. (वार्ताहर)बदलीचे भाव वाढले : सरकारला भ्रष्टाचाराची कीड लागली असून सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. वाळू माफियांना मंत्र्यांचे संरक्षण मिळत असून अधिकाऱ्यांच्या बदलीचे भाव वाढत चालले आहेत, अशी टीका विखे यांनी पाथरे बुद्रूक येथे केली. महसूलच्या अधिकाऱ्यांचे भाव वाढत चालले आहेत. आता तर सरकारने बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सांगत त्यांनी त्यावर टीका केली.
शेतकऱ्यांसाठी मोदींना वेळ नाही का?
By admin | Published: June 26, 2016 3:15 AM