अंबरनाथ : बालाजीनगर परिसरातील खुशी पापुल (५) हिच्यावर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिच्या शरीरावर तीन ठिकाणी या कुत्र्याने चावा घेतला असून डोळ्याला पापाणीजवळ सर्वात गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, गंभीर जखमी खुशीला मुंबईच्या केईएम रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तब्बल तासाभराने या मुलीला मुंबईला हलवण्यात आले. खुशी घरापासून काही अंतरावर खेळत असतानाच एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. घाबरलेल्या खुुशीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच कुत्र्याने तिला तीन ठिकाणी चावा घेतला. तेथील नागरिकांनी तातडीने कुत्र्याला पळवून लावत तिची सुटका केली. पालिकेच्या छाया रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून केईएम रुग्णालयात पाठवले. मुंबईला जाण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णवाहिका मागवली. मात्र, आपण ठाण्यापर्यंतच जाणार असे, त्यातील डॉक्टरांनी सांगितले. नगरसेवक उमर इंजिनीअर, प्रदीप पाटील यांनी रुग्णवाहिका थेट मुंबईलाच न्या, असा आग्रह धरला. सध्या तिच्यावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
कुत्र्याच्या चाव्यातून खुशीचा डोळा बचावला
By admin | Published: March 07, 2017 3:23 AM