मुंबई: दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन नुकताच देशासह परदेशातही पार पडला. या योगदिनाचे वैशिष्ट्य ठरलेल्या राष्ट्रीय योग गीतामध्ये डोंबिवलीकर असलेले गायक गंधार जाधव आणि त्यांची बहिणी गाथा जाधव यांना स्थान मिळाले. आयुष मंत्रालयाने हे गीत राष्ट्रीय योग गीत असल्याचे जाहीर केले आहे. या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३ मिनिटे १५ सेकंदांचे हे गीत हिंदी भाषेत असून ते धीरज सारस्वत यांनी लिहून प्रदर्शित केले आहे. या गीताला सुमंतो रे यांनी संगीत दिलेले आहे. डोंबिवलीचे गंधार जाधव आणि त्यांची बहिण गाथा जाधव यांनी हे गीत गायले आहे. या गीताचे संगीत संयोजन सौरभ भोंजाळ यांचे असून संतोष क्षत्रीय आणि सुमंतो रे यांनी बॅकिंग व्होकल्स दिले आहेत.हे गीत आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून तब्बल एक हजार गीतांमधून निवडले गेले आहे. योग दिनाला ते संपूर्ण देशभरात तसेच चंदीगड येथे झालेल्या भव्य योग सोहळ्यात ऐकवले गेले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय ‘योग गीता’चा मान डोंबिवलीला
By admin | Published: June 28, 2016 3:23 AM