डोंबिवली, दि. 16 - डोंबिवलीत भाजपाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्र्यांसह खासदार-आमदारदेखील येथे उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशातील मंत्र्यांनी मार्गदर्शनही केले. ''देशात बहुतांशी ठिकाणी भाजपाची सत्ता असून आगामी काळात सर्व स्तरावर अधिकाधिक व्यापक प्रमाणात संघटनात्मक जाळ उभं राहणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी सखोल चर्चा करावी, त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. तसेच त्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यसाठी परिश्रम घ्यावेत. केवळ निवडणुका आल्यावर काम करणं, असे न करता दैनंदिन काम वाढवणे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांचे कर्तव्य समजून कामाला लागा'', असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय सचिव उत्तर प्रदेशातील मंत्री महेंद्र सिंग यांनी केले.
डोंबिवलीत ब्राम्हण सभेमध्ये भाजपाचा मेळावा आयोजित केला होता. त्याला कल्याण लोकसभा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. महिलांसह पुरुष, युवक-युवतींची मोठी संख्या त्यासाठी उपस्थित होती. सिंग यांनी भाजपाच्या केंद्रातील विविध योजनांबद्दल माहिती आहे की नाही? याची चाचपणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महेंद्र सिंग हे महाराष्ट्रातील चार लोकसभांचे प्रभारी म्हणून कार्यरत असून केंद्राने त्यांची निवड केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील त्यांच्याकडे देण्यात आला आहे. येथील पक्षाचे काम, बळकटी, संघटनात्मक कार्यपद्धतीबद्दल आणि पार्श्वभूमीबाबत चव्हाण यांनी सिंग यांना माहिती दिली. तसेच कार्यकर्ते सजग, सुज्ञ आहेत. त्यांना चांगल-वाईट हे समजत, त्यामुळे वेगळ प्रबोधन करण्याची गरज नसल्याचे म्हंटले. ठाणे विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी केले.त्यावेळी आमदार नरेंद्र पवार, उपमाहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक नितिन पाटील, महेश पाटील, राजन आभाळे, संदीप पुराणिक यांच्यासह अन्य नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.