ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २७ - डोंबिवली एमआयडीसी परिसरात झालेल्या शक्तीशाली स्फोट प्रकरणात प्रोबेस एंटरप्रायजेस कंपनीच्या मालकविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश विश्वासराव वाकटकर हे कंपनीचे मालक आहेत. स्फोट झाला त्यावेळी वाकटकर यांची दोन मुले नंदन, सुमीत व सून कंपनीत उपस्थित होती.
दरम्यान वाकटकर यांच्या सुनेचा मृतदेह शेजारच्या इमारतीमध्ये सापडला. मुलांचा अजून शोध लागू शकलेला नाही. वाकटकर यांची दोन्ही मुल व सून केमिकल इंजिनीअर होती. गुरुवारी सकाळी ११.३०च्या सुमारास प्रोबेस कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, पाच ते सहा कि.मी.च्या परिसरात या स्फोटाचे हादरे जाणवले.
स्फोटामध्ये प्रोबेस कंपनी पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, शेजारच्या कंपन्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूटाचा खड्ड पडला आहे त्यावरुन स्फोटाची भीषणता लक्षात येते. या स्फोटामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, १४० जण जखमी झाले आहेत.