अनिकेत घमंडी,
डोंबिवली- करमणूक कर न भरल्याने डोंबिवलीत दत्तनगर परिसरातील केबल बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका १८० ग्राहकांना बसला आहे. संबंधित केबलचालकाला दोन वेळा स्मरणपत्र देऊनही त्यांने कर न भरल्याची माहिती समोर आली. ठाण्याचे तहसीलदार कार्यालय तथा करमणूक कर अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर या विभागाच्या विशेष वसुली मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.या कारवाईमुळे ऐन दिवाळीत घराघरामध्ये टीव्ही असूनही केबल नसल्याने ग्राहक संतापले. या संदर्भात केबलचालकाला ग्राहकांनी विचारणा करुनही उत्तरे न मिळाल्याने ते त्रस्त झाले होते. आधी सेटटॉप बॉक्समध्ये काही बिघाड झाला असल्याने केबल चालत नसल्याची समजूत ग्राहकांमध्ये होते. त्यानंतर केबल फॉल्ट असेल असे वाटले. पण अन्यत्र सगळया ठिकाणी केबल सुरु असून केवळ दत्तनगर परिसरातच समस्या असल्याचे समजताच ग्राहकांचा पारा चढल्याची प्रतिक्रिया हरिभाऊ सामंत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. याबाबत आठवडाभर तक्रारी करुनही दाद न मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले. ग्राहकांनी वेळेवर पैसे भरले असतील तरी केबलचालक जर करमणूक कर भरत नसेल, तर कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्नही त्यांनी केला. दिवाळीच्या सुट्या असतानाही टीव्ही बंद असल्याने मुलेही कंटाळल्याचे अन्य ग्राहकांनी सांगितले. अन्य केबल चालकांंकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरमहा प्रत्येक कनेक्शनपोटी ४५ रुपये करमणुक कर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरायचा असतो. मात्र या केबलचालकाने तो वेळच्या वेळी न भरल्याने करमणूक कर थकला. >कर भरण्यासाठी ५ आॅक्टोबरला पत्र देण्यात आले होते. तरीही तो न भरल्याने २७ आॅक्टोबरला करमणूक कर अधिकाऱ्यांनी केबल इनपूट सिग्नल बंद करण्याचे पत्र पाठवले. या आधी संबंधित केबलचालकाने चेकद्वारे कर भरणा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.