ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २८ - शहरातील 'प्रोबेस' या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील बळींचा आकडा १२ वर पोहोचला असून आज सकाळी आणखी एका पुरूषाचा मृतदेह सापडला आहे. मयुरेश वायकोळे असे त्याचे नाव असल्याचे समजते. या स्फोटात एकूण १८३ व्यक्ती जखमी झाल्या असून कंपनीचे मालक वाकटकर यांचे दोन्ही पुत्र सुमीत, नंदन आणि सून स्नेहल यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.
दरम्यान याप्रकरणी प्रोबेस कंपनीचे मालकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी ढिगारा उपसताना रसायनांची गळती होऊन त्रास होऊ नये, यासाठी ५०० मीटर परिसरातील लोकांना घरे सोडून तात्पुरते स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. रसायनांनी भरलेली काही सीलबंद पिंपे हस्तगत करण्यात आली. ढिगारे उपसणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उग्र रसायनांमुळे मळमळणे, भोवळ येणे असा त्रास झाल्याचे समजते. या परिसरातील २००० पंचनामेही करण्यात आले आहेत.
स्फोटामध्ये प्रोबेस कंपनी पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, शेजारच्या एकूण २४ कंपन्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूटाचा खड्ड पडला आहे त्यावरुन स्फोटाची भीषणता लक्षात येते. काही कंपन्यांचे मालक व कामगार उपचार घेत आहेत.