डोंबिवली : जिमखाना रोड येथे राहणारे जेसीबी-पोकलेन व्यावसायिक सतीश रसाळ (४२)यांची त्यांच्या झायलो गाडीतच गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रसाळ यांच्या हत्येमागील कारणाचा लागलीच उलगडा झाला नसला तरी तपासाकरिता पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.मानपाडा रोडवरील ‘क्लासिक हॉटेल’ समोर उभ्या असलेल्या एमएच ०५ एएस ४५५५ नंबरच्या सफेद रंगाच्या झायलो गाडीत रक्ताच्या थारोळ््यात पडलेला एक मृतदेह शुक्र वारी सकाळी ९ च्या सुमारास रिक्षा चालक राजेश पाटील यांना दिसला. त्यांनी त्याची खबर मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख शांताराम अवसरे यांना कळविली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ती व्यक्ती पोकलेन व्यावसायिक रसाळ हे असल्याचा उलगडा झाला.मूळचे निळजे गावातील रहिवासी असलेले सतीश रसाळ यांचा काटई टोलनाका येथे हनुमान जेसीबी-पोकलन सप्लायर हे कार्यालय आहे. काल रात्री १० वाजता ते कार्यालय बंद करून घरी येण्याकरिता निघाले. मात्र रात्रभर ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व अन्य नातेवाईक त्यांना सतत फोन करत होते. रसाळ हे जिमखाना रोड येथे पत्नी व तीन मुलींसह राहत होते. कार्यालयातून घरी परतत असताना बहुदा रात्रीच त्यांची हत्या झाली असावी, असा अंदाज आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व कोणाशी कोणत्या प्रकारचा वाद नसलेल्या रसाळ यांची अशी हत्या झाल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान ही हत्या पूर्ववैमनस्यातून, व्यावासिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाली याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवसरे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)मृतदेह चालकाच्या सीटवर आढळला.कल्याण परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, कल्याण गुन्हे अन्वेष विभागाचे शैलेंद्र नगरकर, श्वान पथक आदींनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. रसाळ यांच्या गळ््यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. ही हत्या एकाने केली नसून ३ ते ४ जणांनी मिळून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या कोणी व का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.पोलिसांनी रसाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुग्णालयात पाठवला असून झायलो गाडी मानपाडा पोलीसांनी जप्त केली असून ती स्थानकातच आहे. मानपाडा पोलिसांसह ठाणे जिल्ह्यातील पाचही गुन्हे अन्वेषण पथके या हत्याकांडाचा तपास करीत आहेत.
डोंबिवलीत व्यावसायिकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 4:54 AM